विकृती :महिलांवर रासायनिक पदार्थाने हल्ला करणारा गजाआड

शनिवार, 19 जानेवारी 2019 (10:33 IST)
मुंबईत काही  दिवसांपासून पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी रेल्वे स्थानकात महिलांवर रासायनिक पदार्थाने हल्ला करणार्‍या नराधमाने दहशत निर्माण केली होती. तब्बल दीड महिन्यानंतर या नराधमाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी सापळा रचून पकडले असून, त्याच्यावर एकाच स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. रामवीर रामरुप चौधरी (२४) असे या नराधमाचे नाव आहे.फर्निचरच्या दुकानात काम करत असल्यामुळे त्याला फेविक्विक ज्वलनशील असल्याचे त्याला माहीत होते. म्हणून केवळ मजेखातर म्हणून तो हे पदार्थ एका इंजेक्शनच्या साहाय्याने महिलांवर फेकत होता.
 
अंधेरी (प.), महालक्ष्मी सोसायटीमध्ये राहणार्‍या गायत्री अंधन शुक्रवारी सकाळी अंधेरी स्टेशनवर आल्या होत्या. गर्दीतून चालत असतानाच त्यांच्या मागून चालणार्‍या एका नराधमाने त्यांच्यावर फेविक्विक फेकले. अंगावर तो पदार्थ पडताच त्यांनी मागे वळून पाहिले असता एक तरुण हातात फेविक्विकची बाटली घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. गायत्री अंधन यांनी लगेच आरडाओरडा केला. त्याला पकडण्यासाठी सापळा रचून उभे असलेल्या निर्भया पथकातील महिलांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पकडून ठेवले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती