अजित पवारांच्या सत्तेतील सहभागानंतर शिंदे गटातील अनेकजणांना मंत्रिपदाच्या इच्छेवर पाणी सोडावं लागल्याची चर्चा असतानाच आता विधासभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. आधीच्या सरकारमध्ये पहिल्या रांगेत असलेल्या शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना आता दुसऱ्या रांगेत बसावं लागत आहे.
अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना पहिल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत जावं लागलं आहे. तर शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांना पहिल्या रांगेत बसायची संधी मिळाली आहे.
शिंदे गटाचे तीन मंत्री मागच्या रांगेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आता अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. पहिल्या रांगेत आधी दहा मंत्री बसायचे, आता त्या रांगेत बारा मंत्री बसत असल्याचं चित्र आहे.