मनसे आता लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करणार

बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (16:05 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. राज ठाकरे यांची पक्षातील नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत  बोलताना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील मनपा वॉर्डची संपूर्ण जबाबदारी या समितीवर असणार आहे.
 
अमित ठाकरे उत्तम प्रकारचं काम करु शकतील असा आम्हाला विश्वास आहे. अमित ठाकरे संयमाने सर्व काम करु शकतात. म्हणूनच राज ठाकरेंनी इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्यावरही जबाबदारी दिली आहे,” अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
 
“प्रत्येक शाखेत जे वास्तव आहे ते राज ठाकरेंसमोर आणायचं आहे. जी परिस्थिती आहे ती मांडायची आहे. मुंबईपासून सुरुवात केली असून नंतर ठाणे, पुणे, नाशिक येथे जाऊ,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान डोंबिवलीतील घडामोडींवर बैठकीत चर्चा झाली की नाही विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यावर काही चर्चा झाली नाही. तो विषय संपला आहे, आता पुढे काय करायचं यावर चर्चा झाली”.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती