बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेने महासभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.मात्र या प्रकल्पाच्या जागा हस्तांतरणावरुन वाद निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवानगी न घेता काम सुरु केलं तर एकही वीट उचलू देणार नाही असा थेट इशारा मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.
मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुलेट ट्रनेच्या जागा हस्तांतरणावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला मनसेकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, आम्ही काम करुन देणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. त्यावेळी देखील मनसेने बुलेट ट्रेनची कामं बंद पाडली होती. शिवसेनेने बंद पाडली नव्हती. कुठलेही काम शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन केलं नव्हते. जर राज ठाकरे यांची परवानगी न घेता हे काम सुरु केलं तर एकही वीट रचू देणार नाही असा इशाराच अविनाश जाधव यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.