महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना खडसावल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी केलेल्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना लिहिलेल्या पत्राचा रोख हा वसंत मोरेंच्या दिशेने असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात आहे. वसंत मोरे आणि राज ठाकरेंमधील नाराजी नाट्य मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. त्यातच आता राज यांनी पोस्ट केल्याच्या दुसऱ्याच दिवशी वसंत मोरेंनी केलेल्या या पोस्टमधून नेमकं त्यांना काय सूचित करायचं आहे याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
“राजकारणाचं काय खरं नाही, निवडणुका ही लोक कधी घेतील माहिती नाय बाबा… जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. सदर फार्महाऊस लग्न, पार्टी, स्वागतसमारंभ, वाढदिवस यांसाठी उपलब्ध असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलं असून हे फार्महाऊस कृष्ण लीला गढी नावाचं असून ते पुरंदरमधील भिवरी येथे असल्याचं पोस्टमधून नमूद करण्यात आलं आहे.
राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं–
“सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाटेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स यामुळे हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही,” असं राज ठाकरेंनी ठणकावलं आहे.