मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथे तिथीनुसार शिवजयंती येत्या 12 मार्चला साजरी करणार

रविवार, 1 मार्च 2020 (17:40 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यात बदल केल्यानंतर आता आक्रमकतेची भुमिका घेतली आहे. तर देशभरात सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या  विरोधात आंदोलन केली जात आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा मुंबईत काही दिवसांपूर्वी सीएएच्या विरोधात एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते. त्याचसोबत औरंगाबादचे   नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे. पण आता येत्या 12 मार्चला तिथीनुसार शिवजयंती औरंगाबाद येथे साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. यासाठी खुद्द राज ठाकरे औरंगाबाद येथे जाणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली. पण आता तिथीनुसार मनसे शिवजयंती साजरी करत शिवसेनेला शह देण्याची खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
 
मनसेच्या नेत्यांची आज एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला अभिजित पानसे, बाळा नांदगावकर, अमेय खोपकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. औरंबाद आणि नवी मुंबईतील महापालिका निवडणूकीसाठी तयारी करण्याचे आदेश या बैठकीत राज ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत एबीपी माझा यांनी अभिजित पानसे यांच्याशी संवाद साधला. पानसे यांनी असे म्हटले आहे की, येत्या 12 मार्चला औरंगाबाद येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून राज ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.  औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ही पानसे यांनी स्पष्ट केले आहे.  
 
 तर दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम सुरू केली आहे. याशिवाय मनसेने नागरिकांसाठी अनोख्या पद्धतीची ऑफर आणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोऱ्यांची माहिती देण्याऱ्या नागरिकांना मनसेकडून थेट 5 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे, असे स्टॉल औरंगाबाद येथील मनसैनिकांनी उभारला आहे. मनसेने घेतलेल्या नव्या भुमिकाचा पक्षासा किती फायदा होईल, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती