गुन्हा दाखल झाल्यानंतरही राज ठाकरेंनी ठोकला शड्डू; अखेर मनसैनिकांना दिले हे स्पष्ट आदेश

बुधवार, 4 मे 2022 (08:10 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मनसैनिकांसाठीचे आदेश काढले आहेत. मशिदींवरील भोंगे उतरविण्याबाबत त्यांनी यापूर्वी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. ती मुदत आज संपत आहे. त्यामुळेच राज यांनी आता विशेष आदेश काढून मनसैनिकांना प्रामुख्याने 3 निर्देश दिले आहेत.विशेष म्हणजे, आज दुपारीच राज ठाकरे यांच्यावर औरंंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, राज्य सरकारने राज्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, असा प्रश्न निर्माण होत होता. मात्र, राज यांनी कुठलीही पर्वा न करता आपल्या मनसैनिकांना हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले आहेत.
 
1. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा
2. भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी. निवेदन पत्र रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत
3. मशिदीमध्ये बांगेला सुरुवात झाली की पोलिसांच्या 100 क्रमांकावर दूरध्वनी करून त्रासाबाबत तक्रार करावी, रोज.
 
राज यांच्या या आदेशामुळे आता मनसैनिक हनुमान चालिसा लावणार का, पोलिस प्रशासनाकडून मनसैनिकांचे अटकसत्र राबविले जाणार की आणखी काही घडणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. राज यांच्या निर्देशानुसार, 4 मे पासून मनसैनिकांनी अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 4 मेचा दिवस अतिशय कळीचा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती