कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे तब्बल १०० कोटी रुपयांची मागणी; राजकीय वर्तुळात खळबळ

बुधवार, 20 जुलै 2022 (15:16 IST)
राज्यात नवे सरकार स्थापन होऊन सुमारे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राज्याचा कारभार सांभाळत आहेत. परंतु लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. सहाजिकच शिंदे गटातील अनेक आमदार तसेच भाजपामधील देखील अनेक इच्छुक आमदार मंत्री पदासाठी मंत्री पदाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फिल्डिंग देखील लावण्यात येत आहे. मात्र अशा परिस्थितीत आमदारांच्या अपेक्षांचा फायदा घेऊन काही भामट्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच अशाच प्रकारचे एक प्रकरण उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाचे नाव येणार, कोणाला मंत्रीपद मिळणार? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली भाजपचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना माहिती दिली होती. त्याआधारे खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये राहुल कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोरच सापळा लावून ही कारवाई केली.
 
राज्यातील नव्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने मंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक आमदार नंदनवन (एकनाथ शिंदे यांचा बंगला) आणि सागर (देवेंद्र फडणवीस यांचा बंगला) या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसत आहेत. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या साहेबांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले.
 
यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, तसेच आमदार राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला रियाज शेख असे नाव सांगणाऱ्या तरुणाचा फोन आला. आमदार साहेबांशी बोलणे झाले असून, खास त्यांच्या कामासाठी दिल्लीहून मुंबईत आलो आहे, असे त्याने सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप कुल यांना दिला. त्यावर चार दिवसांपूर्वी आपणासही या व्यक्तीचा फोन आला होता व मंत्रीपदासाठी पैसे रुपये मागत होता, असेही ते म्हणाले. कुल यांनी स्वीय सचिवाला या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलाविण्यास सांगितले.
 
त्यानुसार १७ जुलैला त्याला ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावण्यात आले. यावेळी कुल यांनी रियाजसोबत जवळपास दीड तास चर्चा करून ही रक्कम १००वरून ९० कोटी रुपयांवर आणली. त्यावर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे लागतील, अशी अट रियाज याने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. एका बाजूला पैसे देण्याची तयारी दाखवतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती