भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. 'सालडयाचे माझे दीड वर्ष बाकी आहेत, त्यानंतर सालगडी म्हणून राहयाचे नाही,' असे स्पष्ट संकेत सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी फुलंब्री येथील एका दीपावली मिलन कार्यक्रमात बोलताना दिले. हरिभाऊ यांच्या संकेतानंतर भाजप मधील इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण, बागडे नानांच्या संमतीशिवाय तिकीट मिळणार नाही, हेही महत्वाचे आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये हरिभाऊ बागडे यांचे नाव आदराने घेतले जाते. राजकारणाची सुरुवात जनसंघापासून करणारे हरिभाऊ बागडे पहिल्यांदा औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून १९८५ मध्ये निवडून आले. यानंतर त्यांनी सलग सहा वेळा या मतदार संघात निवडून येण्याचा मान मिळविला. बागडे नाना यांच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांच्यावर एकही आरोप झाला नाही. सुसंस्कृत आणि सरळ स्वभावाच्या हरिभाऊ बागडे यांनी अचानक सालडयाचे दीड वर्ष बाकी असून त्या नंतर सालगडी म्हणून राहयचे नाही, असे बोलून दाखविल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या नंतर कोण? यावर भाजपच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. येणारी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे माझे मत असून पक्षाचे नाही.