वसई : वसईतील सातिवली येथील एका कंपनीत काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कंपनीच्या मालकानेच सलग दोन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी कंपनीच्या कार्यालयात आणि छतावर या घटना घडल्या. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने फरार आरोपीला पकडून वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 16 वर्षांची असून ती वसई पूर्वेतील सातिवली येथील एका ऑफसेट प्रिंटिंग कंपनीत काम करते.
31 डिसेंबर रोजी कंपनीचे मालक प्रदीप प्रजापती (50) यांनी पीडितेला सांगितले की, तिच्याविरुद्ध तक्रार आली आहे. कराराचे कारण सांगून त्याने तिला आपल्या कार्यालयात बोलावले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने मुलगी खूप घाबरली होती, पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ती कामावर आली. सायंकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यावर मोठ्या सेठला भेटायचे आहे असे सांगून प्रजापतीने तिला थांबवले. त्यानंतर कंपनीच्या छतावर नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. अखेर पीडितेने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.