मंत्री नवाब मलिकांना ईडीचा दणका; आठ मालमत्ता केल्या जप्त

बुधवार, 13 एप्रिल 2022 (21:15 IST)
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चांगलाच दणका दिला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कोठडीमध्ये असलेल्या मलिक यांच्या तब्बल ८ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. त्यामध्ये मुंबईसह काही शहरांमधील मालमत्तांचा समावेश आहे.
 
मनी लॉण्ड्रींग प्रकरणात सध्या ईडीच्यावतीने नवाब मलिक यांची चौकशी सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात मलिक यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित व्यक्तींशी मलिक यांचे कनेक्शन आहे तसेच त्यांनी मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे.

त्याची चौकशी सध्या ईडी करीत आहे. याच चौकशी दरम्यान आता ईडीने मलिक यांच्या संपत्तीवर कारवाई केली आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील  व्यावसायिक जागा, उस्मानाबाद येथील जवळपास १५० एकर जमीन, कुर्ला पश्चिम येथील फ्लॅटस, कुर्ला येथील गोवावाला कंपाऊँड, वांद्रे पश्चिम येथील फ्लॅटस या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत.
 
ईडीच्यावतीने सध्या जोरदार कारवाई केली जात आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, शिवसेना नेते प्रताप सरनाईक, शिवसेनेचे मंत्री अनिल परब आदींवर ईडीने कारवाई करुन त्यांची संपत्ती जप्त केली आहे. ही सर्व कारवाई राजकीय सुडापोटी होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती