अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागांत पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. सुरुवातीचे दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर त्यानंतर १५ डिसेंबपर्यंत विदर्भात पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर-मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १२ आणि १३ डिसेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मात्र या दोन्ही दिवशी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १४ आणि १५ डिसेंबरला प्रामुख्याने विदर्भात पाऊस होणार आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्य़ांतील काही भागांत पुढील दोन दिवस गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. १२ आणि १३ डिसेंबरला पुणे, नगर, सातारा या भागांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर आदी जिल्ह्य़ातही या दोन दिवसांत हलका पाऊस असणार आहे. १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत विदर्भात सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.