शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत वसुलीसाठी उपायुक्त संतोष वाहुळे व अतिक्रमण विभागाच्या पथकाद्वारे शुक्रवारी,सोमवारी आणि मंगळवारी भाडे थकबाकी असणाऱ्या गाळेधारकांच्या विरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली. ज्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत २.५ कोटी रुपयांची भर पडली आहे. सोमवारी केवळ तीन तासाच्या कालावधीत गाळेधारकांकडून ५० लाखांची मोठी वसुली केली होती. मंगळवारी त्यांनी १ कोटी ५० लाखांची वसुली केली आहे.
बुधवार ठरणार निर्णायक
भाडे थकीत असणाऱ्या गाळेधारकांना अतिक्रमण विभागाने बुधवारपर्यंत थकित भाडे भरण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यामुळेच बुधवारी या गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही तर त्यांचे गाळे सील करण्यात येणार आहे. गाळे सील केल्यानंतर त्यांना पुन्हा त्या गाळ्यांचा मालकी हक्क मिळणार नाही व ती थकीत भाडे रक्कम त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून वसूल करण्यात येणार आहे.