भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापाठोपाठ विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, फडणवीस दिल्लीला गेल्याने आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात दिल्लीत खलबतं होणार असल्याची चर्चा आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, बरा प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते.