महिलांच्या न्याय रक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा २७ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडकणार!

रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (17:34 IST)
हिंगणघाट येथे झालेल्या जळीतकांड प्रकारणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महिला व मुलींच्या न्याय रक्षणासाठी मराठी क्रांती ठोक मोर्चाद्वारे येत्या २७ फेब्रुवारीला मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.
 
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी हिंगणघाट येथील पीडित तरुणीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी दारोडा गावी आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून काही मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या २६ फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा मोर्चाकडून देण्यात आला आहे.
 
मराठा क्रांती ठोक मोर्चाने केलेल्या मागण्या 
पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात यावी.
 
पीडितेच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी.
 
या प्रकरणाचे आरोपपत्र तात्काळ न्यायालयात दाखल करण्यात यावे.
 
प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करण्यात यावी.
 
सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तात्काळ नियुक्ती पत्र देण्यात यावे.
 
या मागण्यांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे लक्षात घेता, सरकारने अशा प्रकरणांत आरोपीला एका महिन्यात फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती