मनमाड : रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे पकडला गेला तोतया तिकीट निरीक्षक

मंगळवार, 23 मे 2023 (08:17 IST)
मनमाड  :- मनमाड ते चाळीसगाव दरम्यान धावत्या प्रवासी रेल्वे गाडीत बोगस तिकीट तपासणाऱ्या तोतया तिकीट निरीक्षकाला सुट्टीवर प्रवास करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने रंगेहात पकडले. या इसमास भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, गाडी क्रमांक २२१२१ मुंबई – लखनऊ या गाडीतील बी -३ बोगीतून रेल्वे सुरक्षा बलात कार्यात असलेले कर्मचारी योगेश यादव प्रवास करीत होते. मनमाड ते चाळीसगाव दरम्यान या बोगीत तिकीट तपासणाऱ्या वेशात राजेश. जी. ठाकूर (वय ४५ रा. अहमदाबाद सध्या राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे) संशयस्पद आढळून आल्याने त्यांची विचारपूस केली असता त्यांनी तिकीट निरीक्षक असल्याचे सांगितले.
 
मात्र योगेश यादव यांनी अधिक विचारपूस केली असता तोतया तिकीट निरीक्षक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा कर्मचारी योगेश यादव यांनी सर्व माहिती त्यांचे उच्च अधिकारी पंकज वाडे, मुख्य दक्षता निरीक्षक यांना दिली. त्यांनी सीटीआय चेक रईस अहमद यांना तिकीट तपासणी कर्मचारी पाठवण्यास सांगितले. जळगाव गाडीला पोहोचल्यावर डी. एन. चौधरी व जावेद शेख हे प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी ट्रेनमधून भुसावळपर्यंत आले.
 
त्यात तिकीट तपासणीशी संबंधित घटना बरोबर आढळून आली. माहिती मिळताच गाडी भुसावळला पोहोचण्यापूर्वी अभियोग पथकाचे मुख्य तिकीट निरीक्षक विनयकुमार सचान हे रामेश्वर प्रसाद, राज थानवाल आणि शेख इम्रान यांच्यासह तेथे आले. भुसावळ स्थानकासोबतच आरपीएफचे एसआय नंदलाल राम रेल्वेच्या पेंट्री कारसमोर पोहोचले.
 
ऑन ड्युटी कंडक्टर जी. एस. दुग्गल आणि रजेवर प्रवास करणार्‍या जवान यांचे तक्रार पत्र घेऊन तोतयागिरी करणाऱ्या राजेश. जी. ठाकूर या संशयितास खाली उतरवून पुढील कारवाईसाठी भुसावळच्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 
त्यांच्या विरोधात आयपीसी १७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती