प्लॅटीनमच्या खाणीच्या कंत्राटासाठी मणिपूर जळतोय; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (22:33 IST)
ईशान्येकडील राज्यातील प्लॅटिनम खाणकामाचे कंत्राट गौतम अदानींना देण्यासाठी मणिपूरमधील हिंसाचाराला सत्ताधारी भाजपकडून जाणीवपूर्वक उत्तेजन दिले जात खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
 
बुधवारी औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “गेल्या काही दिवसापुर्वी मणिपूरमध्ये प्लॅटिनमचा मोठा साठा सापडला आहे. हा साठा आदिवासी कुकी समुदायाच्या डोंगराळ प्रदेशामध्ये सापडला आहे. सरकारला प्लॅटिनम खाण हक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्योगपती मित्र अदानी यांना द्यायचा आहे. मणिपूरमध्ये चाललेला हा प्रकार त्या खाणकामाचे टेंडर अदानी यांच्या गळ्यात टाकण्यासाठीचा डाव आहे,” असा आरोप आंबेडकर यांनी केला.
 
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “खाणकामाला परवानगी देण्याचा अधिकार आदिवासी हिल कौन्सिलला नाही. तो अधिकार मणिपूर विधानसभेला आहे. तर आदिवासी हिल कौन्सिलने या प्लॅटिनम खाणीचे कंत्राट खाजगी संस्थेला देण्यास तीव्र विरोध केला आहे. तसेच जर खाणीचे कंत्राट भारत सरकार स्वत:कडे ठेवत असेल तर अदिवासी कौन्सील स्वेच्छेने जमीनी रिकाम्या करून देऊन सरकारला पाठिंबा देतील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, खाणकामाचे कंत्राट खासगी कंपन्यांना दिल्यास त्याचा तिव्र विरोध केला जाईल,” असा दावाही त्यांनी केला.
 
शेवटी बोलताना VBA अध्यक्ष म्हणाले, “खासगी कंपन्यांसाठी खाण हक्कांना कुकी जमातीने तीव्र विरोध केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने कुकिंचा प्रतिकार रोखण्यासाठी, आसाम आणि मणिपूरच्या सीमेवरील मैदानी भागात राहणार्‍या मैतईं या समुदायाच्या आदिवासी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती