एका तरुणाने गत गुरुवारी मुंबईतील वांद्रे- वरळी सी लिंकवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा दोन तास शोध घेतला पण सापडला नाही. अखेर सात तासांनी तो जिवंत सापडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निखर साहू असे या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजता साहूने वांद्रयाहून सी लिंककडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली. टॅक्सीत बसलेला तरुण आधीपासूनच तणावात असल्याचे वाटत होते. त्याचे अनेकदा टॅक्सी वळवण्यासाठीही सांगितले, पण नंतर तो निर्णय बदलत होता. सी लिंकवर पोहोचल्यानंतर फोटो काढण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवण्यास सांगितली. त्यानंतर समुद्रात उडी मारली असे टॅक्सीचालकाने सांगितले.
अचानक घडलेल्या घटनेने टॅक्सीचालक गोंधळून गेला. त्याने तत्काळ पोलसि नियंत्रण कक्षात फोन करुन घटनेची माहिती दिली. बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तब्बल दोन तास शोध घेतला, मात्र हाती लागला नाही. संध्याकाळी ७ वाजता दादरच्या चैत्यभूमीजवळ किर्ती महाविद्यालयाच्या मागील बाजूस किनाऱ्यावर एक तरुण निपचित पडल्याचे काही विद्यार्थ्यांनी पाहिले. त्यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. त्याचा श्वास सुरू होता. त्यांनी लगेच केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सिऑन रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेले.