मीरा भाईदार येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री म्हणाले येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे. कार्यक्रमावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.
मीरा भाईंदर या भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत, आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारला होता, यामुळे ठाणे जिल्हा ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे. मागील कोरोना लाटेचा अनुभव पाहता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.