महाराष्ट्र पाऊस : उद्धव ठाकरे म्हणतात, 'मी पॅकेज घोषित करणारा नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे'
शुक्रवार, 30 जुलै 2021 (18:04 IST)
मी पॅकेज घोषित करणारा नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे. सवंग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ते कोल्हापुरात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दुपारी पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी तातडीची मदत घोषित करावी, आजपर्यंत कोणतीही मदत घोषित करण्यात आलेली नाही अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
त्यावर या मदत पॅकेजविषयी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. दरडग्रस्त हा वेगळा विषय आहे. केंद्राची गरज लागेल तेव्हा मदत मागू. सीतारामन यांना पत्र लिहून मागणी करू."
विमा कंपन्यांनी पंचनामे ग्राह्य धरून मदत करावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
तर "पॅकेज म्हणावं की मदत म्हणावी, सामान्य लोकांना मदत मिळावी ही अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.
पावसाचं प्रमाण, अतिवृष्टीचा इशारा यावरून स्थानिक प्रशासनाने लाखो लोकांचा जीव वाचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहणी केली असून या पूर परिस्थितीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी नागरिकांची अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
अतिरिक्त पाण्याचं नियोजन करणं महत्त्वाचं असून त्यासाठी काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील, आणि ते आपण घेणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. नागरिकांनी कठोर निर्णयांसाठी सहकार्य करावं अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे. पूररेषा पाहून त्यानुसार रेड झोन - ब्लू झोन तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पर्यावरण तज्ज्ञांची मतं यासाठी विचारात घेतली जाणार असून सरकारने वडनेरे समितीसह इतर अहवाल मागवले आहेत.
कोल्हापूरमधल्या पूर परिस्थितीची पाहणी करताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले.
फडणवीस परिसरात आहेत असं समजल्यानंतर आपणच त्यांना थांबायला सांगून तिथे गेल्याचं उद्धव ठाकरेनी सांगितलं. या परिस्थितीवर कायमस्वरूपी मार्ग अवलंबवावा लागेल आणि त्यासाठी मुंबईत बैठक बोलवू, तिथे चर्चा करू असं आपण फडणवीसांनी सांगितल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
शाहुपुरीत भेटल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांनी पुढची पाहणी एकत्र केली.