कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे.अशा स्थितीत, सोमवारपासून (20 सप्टेंबर) पुढील तीन-चार दिवस राज्याच्या विविध भागात मुसळधार आणि अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यभरात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) वतीने हवामान शास्त्रज्ञाच्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थानमधील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये कमकुवत होईल. बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाकडे जाईल. यानंतर, पुढील 2-3 दिवस ते पश्चिम आणि उत्तर-पश्चिम दिशेने जाईल. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा ते मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पडेल. त्यामुळे 22 सप्टेंबरपर्यंत राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल.
कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 20 सप्टेंबर रोजी पालघर,नाशिक,धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी,हिंगोली,नांदेड, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
21 सप्टेंबर रोजी हवामान खात्यानं (IMD) पालघर,ठाणे,नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद,जालना,बीड,वाशिम,अकोला,अमरावती,नागपूर, यवतमाळ,गोंदियासाठी यलो अलर्ट जारी केले आहे. 22 सप्टेंबर रोजी पालघर,ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना,बीड,परभणी, हिंगोलीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली, मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे.तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद,जालना,परभणी,हिंगोली आणि बीडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.