जालन्याच्या घटनेला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार - राज ठाकरे

सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (07:47 IST)
जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी शुक्रवारी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे असल्याचं सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घटनेचा निषेध नोंदवला.
 
दरम्यान मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी खात्रीने सांगतो आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसेल. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं, असे म्हणत राज ठाकरेंनी निषेध नोंदवला आहे.   मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी ट्वीट करत तीव्र शब्दात निषेध केला आहे.  
 
दरम्यान काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे देखील  राज ठाकरे यावेळी म्हणाले.
 
राज ठाकरे म्हणाले, जालन्यातील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनचा निषेध नोंदवतो. मराठा समाजानेआरक्षणासाठी जी आंदोलनं केली त्या आंदोलनांचा इतिहास बघितला तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलन मोर्चे यांचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. ही  पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? याची माहिती पोलिसांच्या अहवालात येईलच पण मी खात्रीने सांगतो की,पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित.
 
राज ठाकरे यांनी जालनाच्या आंदोलनानंतर प्रशासन आणि सध्याची राजकीय परिस्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जालन्यात  काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार असल्याचे देखील  राज ठाकरे म्हणाले.  चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं,यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती,  ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
 
 राज ठाकरे यांचे शांतता राखण्याचे आवाहन
राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये मराठा समाजाला कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणाले, माझी मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत,  तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती