महाराष्ट्रात २४ तासांत राज्यात ५६८ करोना रुग्णांचा मृत्यू; ६७,४६८ नवे करोनाबाधित

बुधवार, 21 एप्रिल 2021 (21:50 IST)
राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची तयारी होत आहे. राज्य सरकारने आधीपासूनच कठोर निर्बंध देखील लागू केले आहेत तरी करोना नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. कोरनाच्या या भीषण रुपात मागील २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ६७ हजार ४६८ नवे करोनाबाधित सापडले आहेत. 
 
गेल्या २४ तासांमध्ये राज्यात तब्बल ५६८ मृत्यूंची नोंद करण्यात आली असून राज्यात आजपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा आता ६१ हजार ९११ इतका झाला आहे. राज्यातला मृत्यूदर १.५४ टक्के इतका नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
 
नव्या करोनाबाधितांचे आकडे देखील रोज उच्चांक गाठत आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार ४६८ नवे करोनाबाधित सापडले असून आत्तापर्यंत राज्यात ४० लाख २७ हजार ८२७ नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सध्या राज्यात ६ लाख ९५ हजार ७४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 
 
आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत राज्यात ५४ हजार ९८५ करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तरी रिकव्हरी रेट अजूनही ८१.१५ इतकाच आहे. आत्तापर्यंत राज्यात ३२ लाख ६८ हजार ४४९ करोनाबाधित बरे होऊन घरी सुखरूप परतले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती