राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत झाली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांवर आपण उपकार करतो आहोत, अशा भावनेतून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करू नका, तर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे, अशा भावनेतून मदत करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करायची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षां निवासस्थानी आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यात आला.