बुलढाणा : जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये गुरांना लम्पी आजाराची प्रचंड लागण झाली आहे. हा आजार आटोक्यात आणण्यात प्रशासनाला आतापर्यंत यश आलेले नाही. लम्पी आजारामुळे राज्यामध्ये सर्वात जास्त गुरे दगावण्याचे प्रमाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आतापर्यंत 4500 च्या वर गुरे लम्पी आजारामुळे दगावली आहेत. तसेच मागील 4 महिन्यांपासून आतापर्यंत 49 हजार 891 गुरांना लम्पी आजाराने वेढले आहे.
शेतकऱ्यांचे महत्वाचे धन म्हणजे, गाय आणि बैल. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यावर्षी अगोदरच निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यात आता लम्पी आजाराने शेतकऱ्यांजवळ असलेले पशुधन दगावत असल्याने बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूरचे शेतकरी सुधीर मानकर हे आहेत. यांच्याकडे जवळपास 8 गायी आणि 4 बैल होते. परंतु लम्पीने यांच्या चार गायी दगावल्या असून अजूनही दोन गायींना लम्पीने ग्रासले आहेत. विशेषबाब म्हणजे, यांनी काही आठवड्यांपूर्वी सर्व जनावरांचे लम्पी लसीकरण केले होते. अद्याप यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नाही.
बुलढाण्यात राहणारे शेतकरी विजय वानखडे. यांच्याकडे जवळपास 12 ते 15 गोवर्गीय गुरे होती, पण यांच्याही गुरांना लम्पीने ग्रासले आणि चार जनावरे मृत्युमुखी पडली. अनेकदा पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे यांनी गुरे दगवल्याची माहिती दिली पण साधी नोंदही यांची घेतल्या गेली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये लंपी आजारावर मात करण्यासाठी पशु संवर्धन विभाग सज्ज असून आतापर्यंत लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा भास करत आहे. परंतु लम्पी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत यश आलेले नसल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. राज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गुरे दगावली असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामधील पशूपालन धारकांनी आपल्या गुरांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण कुमार घुले यांनी केले आहे.
गेल्या 15 दिवसांत 7 हजारांहून अधिक जनावरांचा बळी
लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने केला असला तरी, एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये लम्पीने 7 हजारांपेक्षा जास्त जनावरांचा बळी घेतला आहे. 99.79 टक्के लसीकरण होऊन देखील लम्पीचा प्रकोप थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 4 हजार 469 जनावरांचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर, जळगाव, अमरावती, सोलापूर, अकोला, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनावरांना लम्पीने विळखा घातला आहे. 2 डिसेंबरनंतर तब्बल 3 लाख 56 हजार 958 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे.