महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि 6 केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण 23 चित्ररथ राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहेत. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती प्रतिकृती प्रसिध्द कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एकूण 40 कारागीरांनी अतिशय देखना चित्ररथ उभारला आहे.
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा 15 फुट उंचीचा पुतळा असून ते अग्रलेख लिहीताना दर्शविण्यात आले आहेत.पुतळयाच्या मागे एक प्रिंटीग प्रेस दर्शविण्यात आली असून 1919 मध्ये लो. टिळकांनी लंडनहून मागविलेली डबल फिल्टर प्रिटींग मशीन व त्यातून छपाई होणारे ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्र दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरते मंदिर दर्शविण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती मुर्तीची स्थापना करतानाचे दृष्य दर्शविण्यात आले आहे. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला बंगालच्या फाळणीनंतर लो.टिळकांवर चालविण्यात आलेला मुंबई उच्च न्यायालयातील खटला आणि मंडाले येथील तुरुंगवास दर्शविण्यात आला आहे.