कोरोना रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी नागपुरात आज आणि उद्या (रविवार) दोन दिवस लॉकडॉऊन पाळण्यात येणार आहे. हे दोन दिवस प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध कडक असले तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागील आठवड्यातच घेण्यात आला होता.
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना उद्देशून नियम पाळण्याचे आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कुणीही घराबाहेर निघू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यानुसार शहरातील वैद्यकिय सेवा, वृत्तपत्र संदर्भातील सेवा, दुध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, बस सेवा, ऑटोरिक्षा, खासगी वाहतूक, बांधकामे, उद्योग, कारखाने, किराणा दुकान इत्यादी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा या दोन्ही दिवशी सुरू राहणार आहेत. तर, अत्यावश्यक सेवा वगळता कुठलीही दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरेंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने, शहरातील मांस विक्रीची दुकाने सुरू राहणार नाहीत. नागरिकांनीही अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कुटुंबासोबत दिवस घालवावा आणि कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.