या घटनेत सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास जय भवानी रोड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबट्याने दर्शन दिले. या ठिकाणी बिबट्याला तेथील महिलांनी बघितल्यानंतर नागरिकांना सांगितले. या घटनेनंतर बिबट्या तेथून भर रस्त्याने वावरत होता. बिबट्या फर्नाडिस वाडी येथे राहणाऱ्या सुनील बहनवाल यांच्या घरात शिरला होता. परंतु अचानक बिबट्याला पाहून बहनवाल कुटुंब बाहेर आले. त्यानंतर बिबट्या हा तेथून पसार झाला.
के जे मेहता हायस्कूल परिसरात असलेल्या एका बंगल्याच्या आवारात असलेल्या गाडीखाली लपला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बघताच बिबट्या तेथून बाहेर निघाला व एका बंगल्याच्या हा बारात चालत गेला. याच दरम्यान सदर बिबट्याने क्षत्रिय नावाच्या एका इसमावर हल्ला करून जखमी केले. या घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी हटवणे मुश्कील झाले होते. त्यामुळे बिबट्या हा घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. भरवस्तीत बिबट्या घुसल्यामुळे घरातील नागरिक महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, याच परिसरात राहणाऱ्या एड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील आवारात असलेल्या मारुती सुझुकी गाडी क्रमांक एम एच 15 ए एच 48 40 या गाडीच्या खाली लपला.
दुसरीकडे वनविभागाचे कर्मचारी उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. बिबट्याला जेरबंद करताच त्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. बिबट्या जेरबंद करण्यात आल्यानंतर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कर्मचाऱ्यांचे आभार मानले.