जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही

शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (15:31 IST)
राज्यात जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री करण्यावर सरकारने आता काही निर्बंध आणले आहेत. या निर्बंधांनुसार आता जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून त्याची थेट खरेदी अथवा विक्री करता येणार नाही. जमिनीचे गुंठ्यांत तुकडे पाडून त्याची खरेदी अथवा विक्री करायची असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकरण अथवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
 
एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे.त्या सर्व्हे नंबरमधील एक, दोन अथवा तीन गुंठे जागा तुम्ही विकत घेणार असाल तर, त्याची दस्त नोंदणी होणार नाही.त्यासाठी त्या सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यात गुंठ्यांचे तुकडे पाडून त्याला जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक असेल.अशाच ले-आऊटमधील गुंठ्याने विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी होणार आहे.
 
दरम्यान यापूर्वी तु़कड्यात जमिनीची खरेदी अथवा विक्री केली असेल तर आता अशा व्यवहारासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र एखाद्या जमिनीचे भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चिती होऊन मोजणी नकाशा देण्यात आला असेल तर अशा तुकड्याने खरेदी -विक्री केलेल्या जमिनीसाठी ही परवानगी आवश्यक राहणार नाही. याबाबत नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने हे परिपत्रक जारी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती