केटीएचएमच्या प्राध्यापकांचे शेतमालातील कीटकनाशक अंश शोधणाऱ्या संशोधनाला पेटंट

शनिवार, 4 जून 2022 (21:21 IST)
फोटो साभार- सोशल मीडिया 
पिकाच्या कीड-रोग नियंत्रणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय शेतमाल निर्यात करताना मानवी आरोग्याची बाब गांभीर्याने घेत सध्या ‘किमान रेसिड्यू मर्यादा’ महत्वपूर्ण मानली जाते. त्यासाठी विविध चाचण्या केल्या जातात. त्याअनुषंगाने नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील प्रा.डॉ.विक्रम काकुळते, मायक्रोबायोलॉजी विभागातील प्रा.वैशाली अर्जुन टिळे व प्रा.अमृता उत्तमराव जाधव यांच्या ‘पेस्टींसाईड डिटेक्टिग प्लेट’ हे उपकरण तयार केले आहे. या संशोधनाला हे पेटंट मिळाले आहे.
 
धान्य, फळे व भाजीपाला उत्पादनात कीटकनाशकांची फवारणी केली जाते. मात्र त्यापैकी काही कीटकनाशकांची कमाल मर्यादा मानवी आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे आयात व निर्यात प्रक्रियेत मालाची तपासणी काटेकोरपणे होत असते. जर शेतमालामध्ये कीटकनाशकांची कमाल पातळी आढळल्यास शेतमाल नाकारला जातो. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे या संशोधनाचा शेतकरी,आयाय निर्यात विभाग, कोल्ड स्टोरेज उद्योजक आदींना त्याचा फायदा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
‘कीटकनाशके’ या संज्ञेत कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, उंदीरनाशके, मॉलसाईड्स, सूत्रकृमीनाशक, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अशा विविध प्रकारच्या संयुगांचा समावेश होतो. मानवी आरोग्याचा विचार करून त्यांच्याकडे लक्ष दिले जाते.मात्र कृषी उत्पादकता वाढ, कीड-रोग नियंत्रण, पीकसंरक्षण तसेच लागवड संवर्धन यासाठी वापर वाढता आहे. मात्र सध्या होणारा अतिरिक्त वापर हा मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका पोहचवीत आहे,तर दुसरीकडे पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कीटकनाशकांमधील काही विषारी घटक मानवी आरोग्यावर गंभीर परिणामांशी संबंधित आहेत. असे हानिकारक घटक तपासणे हा या संशोधनाचा मुख्य गाभा आहे.
 
धान्य, फळे व भाजीपाला यामधील हानिकारक घटकांची माहिती अवगत होणार आहे. त्यामध्ये हानिकारक घटक आहेत की नाही हे ओळखण्यासाठी उपकरणातील प्लेटमध्ये एक थर समाविष्ट आहे. त्यामुळे शेतमाल खाण्यास योग्य आहे का? आणि असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण मानवी जीवनास हानी पोहोचवू शकते,हे त्यातून स्पष्ट होते. याद्वारे कीटकनाशकाचा कोणताही प्रकार ओळखल्यानंतर थराचा रंग बदलतो आणि ते वापरण्याचे धोके सांगण्यासाठी एलईडी दिवे वापरून संकेत प्राप्त होतात. 
 
ऑरगानोक्लोरीन,ऑर्गेनोफॉस्फरस,कार्बोमेट्स आणि पायरेथ्रॉइड्ससारखी कीटकनाशके शोधण्यासाठी अनेक विशिष्ट आणि विशिष्ट नसलेल्या क्रोमोजेनिक अभिकर्मकांचा वापर केला जातो.त्यामध्ये उच्च संवेदनशीलता आणि सुधारित निवडकता लक्षात येण्यासाठी अनेक क्रोमोजेनिक अभिकर्मक सादर केले गेले आहेत.क्रोमॅटोग्रामच्या स्वरूपात कीटकनाशकांसह अभिकर्मकाच्या अभिक्रियामुळे रंग तयार होतो. डिफेनिलामाइन, ऑर्गेनोमेटलिक अभिकर्मक,सोडियम नायट्रोप्रसाइड,ओ टोलुडिओडाइन , पोटॅशियम आयोडाइड यांसारखे अभिकर्मक वापरले गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती