कोल्हापूर :गेली तीन दशकांपूर्वी अभिषेक करण्यासाठी बनवलेली करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्त केली. या मंगलमय प्रसंगाने अंबाबाईची मूर्ती देवस्थान समितीकडे की, पुजाऱ्यांकडे हा वादही गळून पडला. सराफ संघाने लोकसहभागातून साकारलेल्या या मूर्तीसाठी तब्बल 51 किलो चांदीचा वापर झाला आहे. महाद्वार रोड, कसबा गेट येथील प्रसिद्ध चांदी कारागिर वसंतराव माने यांनी अंबाबाईच्या मुळ मूर्तीची प्रतिमासमोर ठेवूनच शास्त्रोक्त पद्धतीने चांदीची मूर्ती बनवली आहे.
51 किलो चांदीमध्ये अंबाबाईची मूर्ती हे ऐकताना आणि वाचताना हे जरी आनंद वाटत असला तरी त्यामागील इतिहास मात्र थोडा वेगळा आहे. 1987 च्या सुमारास करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची झीज होत असल्याचे दिसून येऊ लागले होते. झीज आणखी होऊ नये म्हणून मूर्तीवर अभिषेक करणे थांबवले गेले. पुढील 3 वर्षांनी म्हणजे 1990 साली ज्येष्ठ नेते माजी मंत्री (कै.) श्रीपतराव बोंद्रे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासह तत्कालीन जिल्हधिकारी यांनी अभिषेकसाठी चांदीची मूर्ती बनवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे तत्कालिन अध्यक्ष सुरेंद्र पुरवंत व संचालक मंडळाशी चर्चा करुन अभिषेकासाठी अंबाबाईची चांदीची मूर्ती बनवून देण्याचे आवाहन केले.