खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणा-यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर भामट्यांना फोन पे व्दारे खंडणी नातेवाईकामार्फत पाठवत पोलिसांनी लोकेशन मिळवत सापळयात अडकवले. भंगाराचा माल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून मुरली रघुराज भंडारी या २४ वर्षीय व्यापा-याचे अहमदाबाद ते धुळे प्रवासादरम्यान अपहरण झाले होते. त्याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.
या अपहरणाची माहिती भाऊ नीलेश भंडारी (मदुराई, तामिळनाडू) यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना १४ नोंव्हेबर रोजी फोनव्दारे दिली. यावेळी भंडारी यांनी अपहरण करणा-यांनी तीन लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचे सांगितले. हे पैसे फोन-पेवर पाठवा, पैसे न पाठवल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिल्याचेही सांगितले. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर या अपहरण झालेल्या व्यापा-याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सुरु केला. या शोधात हा व्यापारी सटाणा परिसरात असल्याचे आढळले.
अशी केली सुटका
लोकेशन मिळाल्यानंतर अपहरण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या सांगण्यावरून पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहचेपर्यंत थोडी-थोडी रक्कम फोन-पेव्दारे खंडणीखोरांना ट्रान्सफर केली. त्या दरम्यान पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास सुरु ठेवला. तेव्हा पोलिसाना अपहरण झालेली व्यक्ती व खंडणीखोर हे सटाणा परिसरात असल्याचे स्थान निश्चित केले. त्यानुसार तपास सुरु ठेवून लोकेशनवर पोहचून संशयितांना ताब्यात घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका पोलिसांनी केली.
हे आरोपी अटकले जाळ्यात
या कारवाईत दादाराम अख्तर भोसले, बबलु उर्फ बट्टा छोटू चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे साथीदार श्यामलाल भारलाल पवार, लुकडया फिंग्या चव्हाण, मुन्ना कलेसिंग भोसले, रामदास उर्फ रिझवान भारलाल पवार हे पोलीसांची चाहूल लागताच डोंगराळ भाग व जंगलाचा फायदा घेवून पळून गेले. दरम्यान, या प्रकरणाबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोळी करत आहेत.