खैरेंचा अगोदर सत्कार, संजय शिरसाट चिडले; मंच सोडून निघाले

रविवार, 28 ऑगस्ट 2022 (11:08 IST)
राज्यात सध्या मुळ शिवसेना आणि शिंदे शिवसेना गट यांच्या वाद सुरू आहे. या वादाचे पडसाद पोलीस आयुक्तालयांकडून गणेश उत्सवानिमित्त आयोजित समन्वय बैठकीत पडले.
 
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले. हे प्रोटोकॉल नुसार चुकीचे असल्याचे म्हणत खुर्चीवरून उठत कार्यक्रम सोडून शिरसाट निघाले होते.
 
दरम्यान बाजूलाच बसलेल्या एम.आय.एम. पक्षाचे खासदार इम्तियाज जलील त्यांचा हात धरून रोखले व त्या नंतर शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालायच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झालेल्या नेत्यांच्या रुसवे फुगव्याची मात्र जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
 
संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित या बैठकीत सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. सध्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले. खैरेंचे नाव ऐकताच आमदार संजय शिरसाट संतापले खुर्चीवरून उठून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
 
प्रोटोकॉल नुसार माझा सत्कार खैरे यांच्या अगोदर करायला हवा असे म्हणत ते मंच सोडून जात होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले. पोलीस आयुक्तालयाने प्रोटोकॉल पाळला नसल्याबाबत उघड नाराजी व्यक्त करताच, खासदार जलील यांनी त्यांचा हात धरला. त्यांची समजूत काढून शांत केले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती