केतकी चितळेच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड

मंगळवार, 17 मे 2022 (08:05 IST)
वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याद्वारेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केतकीने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे. तिला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सध्या तिची कसून चौकशी सुरू आहे.
 
पोलिसांना तपासात हे निदर्शनास आले आहे की, केतकीची ती वादग्रस्त पोस्ट दोन वर्षांपूर्वीची म्हणजेच 2020 मधील आहे. मात्र, त्यावेळी ही पोस्ट व्हायरल झाली नव्हती. मात्र, आता ती रिपोस्ट करण्यात आली. तसेच, व्हायरल करण्यात आली आहे. यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने आता पोलिस तपास करीत आहेत.
 
पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून केतकीच्या घराचीही झडती घेतली आहे. काही कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. मोबाईल, लॅपटॉप आणि कागदपत्रे या सर्वांचा कसून तपास केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती