भारताचे विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. हायप्रोफाईल केसमध्ये सहभाग विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. 80 हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी 2 जी स्पेक्ट्रम हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
विशेष म्हणजे न्यायमूर्ती लळीत हे देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. कुलदेवता नृसिंह लक्ष्मीचे मंदिर येथे आहे. आताही आठ ते दहा लळीत कुटुंबीय या गावात वास्तव्य करत आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी काही लळीत कुटुंबीय कुंभवडे, पेंढरी, हरचेरी चुना-कोळवण तसेच रायगड जिल्ह्यातील रोह्याजवळ आपटे या गावांमध्ये स्थलांतरित झाले.
लळीत यांचे आजोबा, चार काका, वडील वकिली करायचे. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी दिवंगत ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. नंतर ते दिल्लीला गेले. सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.
भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च न्यायिक संस्था आहे. भारतीय संविधानानुसार हे भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय आहे. तसेच हे सर्वात वरिष्ठ घटनात्मक न्यायालय असून महत्वाचे म्हणजे याला न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. या न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात.
न्यायदानाचा ४५ वर्षांहून अधिक अनुभव असणारे आणि संवैधानिक प्रकरणांचे जाणकार एन व्ही रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहणार आहेत. अर्थातच ते दोन वर्षांहूनही कमी काळासाठी सरन्यायाधीश पदावर राहतील. सरन्यायाधीश पदावर पोहचणारे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे एन व्ही रमणा हे पहिले न्यायमूर्ती ठरले होते.