नोकरीचा बनावट एसएमएस; एनआयसीने कारवाई करत केला पर्दाफाश

शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (15:01 IST)
नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर(एनआयसी)ला एका बनावट एसएमएसची माहिती मिळाली होती. एका नोकरीच्या संदर्भात हा बनावट एसएमएस एनआयसीच्या नावाने सर्वत्र फिरवला जात होता. या बनावट एसएमएसबाबत माहिती मिळाल्यानंतर, एनआयसीच्या कर्मचाऱ्यांनी अंतर्गत तपास त्वरित सुरू केला आणि हा बनावट एसएमएस एनआयसीच्या अंतर्गत व्यवस्थेमधून पाठवण्य़ात आलेला नाही, असे आढळले.
 
एनआयसी पथकाने त्वरित दूरसंवाद सेवा पुरवठादारांशी समन्वय साधून तपास केला आणि असे आढळले की हा बनावट एसएमएस एका खासगी एसएमएस सेवा पुरवठादाराकडून पसरवण्यात आला आहे. या बनावट एसएमएसमध्ये एनआयसीच्या नावाचा गैरवापर केला जात आहे, ही बाब लक्षात घेऊन, हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे आणि यात संभाव्य आर्थिक घोटाळ्याची बीजे असू शकतात, हे लक्षात घेऊन एनआयसीने ताबडतोब हा प्रकार सीईआरटी-इन ला कळवला आणि बनावट एसएमएस तयार करणा-यांचा पर्दाफाश करून त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या संस्थांक़डे तक्रारही नोंदवली. पुढील दुरूपयोग टाळण्यासाठी, सीईआरटी-इनने ताबडतोब या बनावट प्रकारातील यूआरएल काढून टाकण्यासाठी संबंधितांशी समन्वय साधला.
 
सामान्य नागरिकांना याद्वारे सल्ला देण्यात येत आहे की अशा बनावट एसएमएसबाबत त्यांनी दक्ष रहावे. आणि अशा फसवणूक करणाऱ्या एसएमएसबाबत [email protected] आणि https://cybercrime.gov.in वर प्रकार नोंदवावा, असे एनआयसीने म्हटले आहे.
 
Edited by- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती