पोलिस भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेच्या स्वरूपात आयत्या वेळी बदल करून राज्य सरकारने पात्र ठरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. पोलिस भरतीसाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि कणखर उमेदवार इच्छुक असतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील उमेदवारही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांना नोकरीची संधी नाकारण्याचाच सरकारचा हा प्रयत्न असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. सरकारने भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा निषेध करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.