वॅट कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने तात्काळ आटोक्यात आणावेत - जयंत पाटील

सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (15:12 IST)
महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी जपळपास ९०रू पर्यंत पेट्रोलच्या किमती पोहचल्या आहेत. नांदेड-परभणीकरांना तर ९२ रु. किंमत द्यावी लागत आहे. एवढा प्रचंड महागाईचा आगडोंब महाराष्ट्रात व भारतात उसळलेला आहे. जे नरेंद्र मोदी व त्यांचे प्रमुख नेते तसेच सर्व मंत्रिमंडळात बसलेले नेते हे पेट्रोल दर ५०-६० रुपये झाले तरी ओरडत होते तीच मंडळी आज नव्वदीवर पेट्रोल जाऊन पोहचले तरी काहीच बोलत नाही. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे जगणे आता कठीण झाले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणतात की पेट्रोल जीएसटीच्या कक्षेत घेण्यास आमची हरकत नाही. परंतु जीएसटीमध्ये पेट्रोल घेतील तेव्हा घेतील, त्यासाठी अनेक राज्यांची परवानगी लागते. पण पेट्रोलवरील बेसुमार वॅट हा सरकारच्या हातात आहे. त्याची किंमत एवढी कमी करा की किमान १५ रु. दर कमी होतील, अशी सूचना पाटील यांनी केली. पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी करण्याकडे राज्य सरकार का लक्ष देत नाही, असा प्रश्न उपस्थित करतानाच मुख्यमंत्र्यांनी या देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात महाराष्ट्र अग्रेसर रहावे म्हणून ही मर्दुमकी आपण गाजवत असाल तर गरीबांनी महाराष्ट्रात जगायचे कसे असे त्यांनी विचारले. वॅट हा कर महाराष्ट्र सरकारच्या कक्षेत आहे. जो बसवण्याचा, कमी करण्याचा, वाढवण्याचा आजही अधिकार महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे. हा कर ताबडतोब कमी करावा. पेट्रोल डिझेलचे दर किमान १५ रु. कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती