आमच्या पक्षात गटबाजी नाही - जयंत पाटील

बुधवार, 9 मे 2018 (16:42 IST)

- प्रदेशाध्यक्षांच्या फेसबुक लाईव्हला भरभरून प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकजुटीने काम करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आज जयंत पाटील यांनी फेसबुकद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत होते. या फेसबुक लाईव्हला कार्यकर्त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
 

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ लेवलवर जास्त भर देणार असून पक्षाच्या संघटनेत तरुणांना संधी देण्यास आम्ही प्राधान्य देऊ, येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मेहनत घेईल असे आश्वासन पाटील यांनी दिले. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इव्हीएम मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते, पक्ष या बाबींकडेही लक्ष देईल असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील भ्रष्टाचारावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ज्याप्रमाणे अलिबाबा आणि चाळीस चोर होते त्याप्रमाणेच आपल्या राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे २२ मंत्री आहेत. राज्यातील मंत्री भ्रष्टाचार करतात आणि मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करतात असं धोरण सध्या राज्यात राबवले जात आहे अशी टीका त्यांनी केली. भाजप सूडबुद्धीचे राजकारण करत आहे. ज्येष्ठ नेते भुजबळ यांनाही सूडबुद्धीने अटक करण्यात आली होती. मात्र आता भाजपवर तोंडावर पडण्याची वेळ आली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
 

या फेसबुक लाईव्हदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील हत्याकांड, राज्यातील पोटनिवडणुका, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, शेतकऱ्यांची कर्जमाफी, सहकार चळवळ आणि राज्यातील इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती