‘जायकवाडी’साठी पाणी सोडल्यास जलसमाधी; नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न

शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (20:58 IST)
मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त साठा १५ ऑक्टोबरच्या स्थितीनुसार ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडण्याच्या हालचाली असल्याने शुक्रवारी (ता. २७) नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणीप्रश्न पेटला.
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या वक्राकार गेटसमोर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले.
 
जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास त्याच पाण्यात मोठ्या संख्येने जलसमाधी घेण्याचा थेट इशारा पाटबंधारे विभागासह शासनाला शेतकऱ्यांनी दिला.
यंदाच्या पावसाच्या हंगामात अल्प पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, सटाणा तालुक्यात भीषण पाणी टँचाई निर्माण झाली असतांना टँकर द्वारे पाणी पुरवठा ग्रामीण भागात सुरु असून यातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून ऑक्टोबर महिन्यात देण्यात आल्याने नाशिक जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा अमुता पवार यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब गुजर, गोरख गायकवाड, राजाराम मेमाणे,लहानू मेमाणे, केदारनाथ तासकर, शरद शिंदे, मिलन पाटील, अरुण आव्हाड, आंबादास घोटेकर, भागवत वाघ, रवी आहेर, किशोर बोचरे, विलास नांगरे, श्रीहरी बोचरे, अंकुश तासकर, संदीप लोहटकर, दशरथ सांगळे, संजय पगारे, बापु पगारे, रंगनाथ घोटेकर, किरण कुलकर्णी, गोरख कांदळकर आदी आंदोलकांनी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाच वक्रकार गेट समोर नदी पत्रात उतरून एक तास ठिय्या आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती