जिल्ह्यातील मेडीकलमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक.जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे निर्देश.अंमली पदार्थ विरोधी प्रभावी कारवाई.

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (20:43 IST)
जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे करण्याकरीता औषधे विक्रेते यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन प्रभावीपणे परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तसे आदेश दिले आहेत.
 
मुलांमधील अंमली पदार्थाचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हा हद्दीतील सर्व औषधे विक्रेते दुकानदारांना सदर आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सदर आदेशानुसार विक्री करणारे विक्रेते यांनी त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे.
 
जिल्हा औषध नियंत्रण विभाग, सी.डब्ल्यू.पी.ओ. विभागाने जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व औषध विक्रेते दुकानदारांना सीसीटिव्ही कॅमेरे लावणेत आले अगर नाही याबाबत पडताळणी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून सर्व औषध विक्रेते दुकानदार यांनी एक महिन्याच्या आत सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. जर मेडिकल, फॉर्मसी दुकानदार यांनी सीसीटिव्ही कॅमेरा लावणेंत आलेला नाही,असे आढळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सदर आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.
 
राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी एक युद्ध नशे विरुद्ध व नशा मुक्त भारत या विषयाबाबत एकत्र कृती आराखडा तयार केला असून जिल्हानिहाय माहिती तातडीने देण्याबाबत सूचना केल्या होत्या, या अनुषंगाने सदर आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती