बेस्ट विरोधात आंदोलन केल्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने दोन्हीही नेत्यांना फटकारले आहे. खटला प्रलंबित असताना गुजरात निवडणुकीत प्रचाराला जाणे आवश्यक आहे का? , असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी आता दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. कारण भाजप नेत्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे न्यायालयाचे कामकाज अपूर्ण राहत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
भाजप विरोधी पक्षात असताना कोरोना काळामध्ये वाढीव वीजबिले आकारण्यात आल्याच्या कारणावरून सन २०२० मध्ये लॉकडाऊनच्या काळात बेस्टनेही विजेचे दर वाढवल्याने बेस्ट कार्यालयात बेकायदेशीरपणे केलेल्या आंदाेलना प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपच्या तत्कालीन आमदार राहुल नार्वेकर आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आरोपीच्या वकिलांकडे न्यायालयाने गैरहजेरीबाबत विचारणा केली असता ते गुजरात निवडणुकीच्या कामासाठी गेल्याची माहिती ॲड. मनोज गुप्ता यांनी दिली. ते नेमके कोणत्या अधिकृत कामासाठी गेले आहेत आणि कधीपर्यंत गैरहजर आहेत याचा तपशील दाखल करा, असेही न्यायालयाने खडसावले आहे. परंतु ते दोघे कोणत्या अधिकृत कामासाठी गेले त्याची माहिती नाही परंतु त्यांना खटल्याच्या गांभीर्याची माहिती देण्यात आली आहे, असे ॲड. गुप्ता यांनी न्यायालयात सांगितले. दोन वर्षापूर्वी त्या परिस्थितीत वाढीव वीजबिले आकारण्यात आली होती. यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. त्या वेळी नार्वेकर लोढा यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते.
तसेच बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखण्याचा प्रयत्नही केला. याबाबत फौजदारीसह विविध कलमांतर्गत लोढा आणि नार्वेकर यांच्यासह अन्य २० जणांवर विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. सध्या त्यावर न्यायालयात न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर आरोप निश्चितीवर सुनावणी सुरू आहे, मात्र शुक्रवारच्या सुनावणीत २० पैकी ११ आरोपी गैरहजर राहिले. त्यात लोढा व नार्वेकर यांचा समावेश होता. मात्र यापूर्वी ते दोघे फक्त एकदाच न्यायालयात हजर होते.