भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची राज ठाकरेंवर टीका

सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (08:12 IST)
भाजपनं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे, या भाषणानं शिक्कामोर्तब झालं आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राहुल गांधी यांच्यावर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील गटाध्यक्ष मेळाव्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 
 
एका व्हिडीओच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. हा व्हिडीओ सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ते म्हणाले की, “१६ वर्षात त्यांनी ज्या भूमिका बदलल्या त्याला जनतेचा पाठिंबा मिळत नाही. जनतेला त्या तर्कसंगत वाटत नाहीत. राजकीय यश मिळत नाहीत, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते दुसऱ्यांवर आणि माध्यमांवर खापर फोडत आहेत. मनसेचं कार्य जनतेच्या विस्मृतीत जाण्यासाठी यंत्रणा कार्यरत असल्याचं ते म्हणतात. जनतेची स्मृती निर्धारित करता येऊ शकते हा जावई शोध त्यांनी लावला आहे”
 
पुढे सचिन सावंत म्हणाले की, “मनसेनं निश्चितपणे एवढ्या वर्षात इतक्या भूमिका बदलल्या की आपली खरी भूमिका कोणती हे पाहताना बुद्धीभ्रम होण्याची शक्यता आहे. मनसेनं आपला मेंदू भाजपकडे गहाण ठेवला की काय अशी शंका यावी असं त्यांचं भाषण होतं. ज्या पक्षाला जनतेला ब्लू प्रिंट देणार असं आश्वासन देऊन ती अजून देता आली नाही. ते स्ट्रॅटजीबद्दल बोलतात ही विरोधाभासी गोष्ट आहे. ज्यांचा मेंदू भाजपकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधी यांच्या बुद्धीमत्तेबद्दल, लायकीवर बोलावं, ही दुर्दैवाची आणि हास्यास्पद गोष्ट आहे. एके ठिकाणी महाराष्ट्रातील प्रवक्ते जी भाषा बोलतात त्यामुळं राजकारणाचा स्तरखाली आला आहे असं ते म्हणतात. ज्या पद्धतीची भाषा राहुल गांधींसाठी त्यांनी वापरली त्यावरुन प्रवक्त्यांचे मेरुमणी राज ठाकरे आहेत हे दिसतं”, अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती