इर्शाळवाडी : 'ढिगाऱ्यात मुलं चेपलेली, हाताने वखरून त्यांना बाहेर काढलं'
रविवार, 23 जुलै 2023 (11:30 IST)
"दरड कोसळली तशी आमच्या अंगावर भिंती, लाकडं पडायला लागली, पत्रे पडले त्याच्याखाली मुलं चेपली होती. त्यांना मी हातानं वखरून बाहेर काढलं अन बाहेर पळालो."
इर्शाळवाडी दुर्घटनेतून बचावलेल्या एका महिलेने त्या रात्री घडलेला घटनाक्रम सांगितला.
इर्शाळवाडीवर बुधवारी (20 जुलै) रात्री दरड कोसळली. आवाजाने हादरलेले लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पडायला लागले. पण काही जण मागे राहिले, तर काही अडकले.
मागे राहिलेले आपले कुटुंबीय कुठे आहेत, कसे आहेत, ते आपल्याला भेटतील की नाही, याच काळजीत आहेत तर बचावलेले लोक पुढे काय होणार म्हणून व्याकूळले आहेत.
ती महिला बीबीसीशी बोलताना सांगते, "आम्ही झोपलेलो, आई ओरडली म्हणून आम्ही एकदम जागे झालो बाहेर आलो आणि बघतो तर बाहेर कोणच नव्हतं. सगळं गावं मातीत गाडलं गेलं होतं."
आपली व्यथा मांडताना ती महिला सांगते, "गोठ्यात बकऱ्या होत्या, एक बैल होता, सोनं नाणं होतं आधार कार्ड होतं, बँकेची पासबुकं होती सगळं जमिनी खाली गाडलं गेलं. आता पुढे काय करायचं, आसरा कुठं शोधायचा हा प्रश्न आहे."
गावच्या जिल्हा परिषद शाळेत बचावलेले गावकरी जमले होते. त्यात कित्येक जणांना जखमा झाल्या होत्या. त्यातल्या एका वयस्क बाबांच्या पायाला लागलं होतं. त्यांनी त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली होती.
ते बाबा सांगतात, "भिंत कोसळली आणि पायाला लागलं पण तसंच आस्थी आस्थी उतरत खाली आलो."
गावातला एक तरुण सांगतो, "आमच्या कुटुंबात आम्ही सहा सात माणसं होतो. दरड कोसळली तशी एका बाजूची भिंत सुद्धा कोसळली. ते बघून आम्ही पटापट बाहेर पडलो आणि आमच्या गावाच्या बाजूला जी शेत होती तिकडे पळत गेलो. पाऊस धो धो पडत होता. पूर्ण रात्र आम्ही तशीच काढली आणि मग सकाळी खाली आलो. सकाळी गाव बघायला लागलो तर एक सुद्धा घर दिसत नव्हतं."
सरकारकडून काय अपेक्षा आहेत, असं विचारल्यावर तो तरुण सांगतो, "सरकारने आम्हाला पक्की घर बांधून द्यावी. व्यवसाय करायला थोडीफार जागा द्यावी. डोंगरावर आमची शेती होती पण आता तिकडे कोणी काही जाणार नाही."
एक गावकरी सांगतो, "कधी ना कधीतरी दरड कोसळेल असा मला वाटलंच होतं म्हणून आम्ही ताडपदरी टाकून खालच्या बाजूला झोपड्या टाकल्या होत्या. पण फॉरेस्टवाल्यांनी येऊन त्या काढल्या आणि इथं काय करायचं नाही असं सांगितलं. मग आम्ही घाबरलो आणि पुन्हा खाली जाण्याचा विचार सोडून दिला."
मृतांची आकडेवारी
रायगड जिल्ह्यात उंच डोंगरावर पायथ्याशी वसलेल्या या इर्शाळवाडीतील 229 लोकांपैकी 27 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 10 जणांवर उपचार सुरू आहेत.
तसंच, 124 जण सुरक्षित आहेत. अजूनही 78 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे.
कुठे आहे इर्शाळगड?
मुंबई-पुणे प्रवासात जुन्या महामार्गावरून गेला असाल, किंवा कर्जत-पनवेल रेल्वे लाईननं प्रवास केला असेल, तर तुम्हाला इर्शाळगड दिसेल.
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातल्या चौक गावाच्या उत्तरेकडचा हा छोटा किल्ला त्याच्या सुळक्याच्या विशिष्ट आकारामुळे लगेच लक्ष वेधून घेतो. याच सुळक्याच्या भागाखाली, साधारण पूर्वेला डोंगरपठारावर इर्शाळवाडी ही आदिवासी वस्ती आहे.
याच इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. हा परिसर नेमका कसा आहे? जाणून घेऊयात.
ज्या डोंगरावर हे गाव वसलं आहे, त्याच्या ईशान्येला माथेरानचा डोंगर आहे आणि पायथ्याशी मोरबे धरणाचा नवी मुंबईला पाणी पुरवणारा जलाशय आहे.
दुर्ग अभ्यासक आणि रायगड जिल्ह्यातील 59 किल्य्यांची माहती देणाऱ्या इये देशीचे दुर्ग या पुस्तकाचे लेखक सुखद राणे यांना हा परिसर परिचयाचा आहे.
ते सांगतात की, इर्शाळगडाच्या पश्चिमेस पनवेल, वायव्येस प्रबळगड व मलंगगड, उत्तरेस चंदेरी व पेब, नैऋत्येला कर्नाळा किल्ला, दक्षिणेला माणिकगड व सांकशी हे किल्ले आहेत तर पूर्वेस खंडाळा घाट व नागफणी आहे.
इर्शाळगडाचा इतिहास
इर्शाळगडाचा इतिहासात फार कुठे उल्लेख येत नाही. पण आसपासचे गडकिल्ले आणि या परिसरातून बोरघाटाकडे म्हणजे आजच्या खंडाळा घाटाकडे जाणारी वाट पाहता, टेहळणीसाठी आणि मुख्यतः संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी या गडाचा वापर होत असावा, असं या परिसरातले इतिहास अभ्यासक सांगतात.
शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरी पर्यंतचा मुलुख घेतला तेव्हा हा गड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा, असं स्थानिक संशोधक सांगतात.
या गडाचं नाव फारसं कुठे इतिहासात घेतलं जात नसलं, तरी जवळच्या चौक गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांचे सरनौबत आणि निकटवर्तीय नेताजी पालकर यांचा जन्म याच चौक गावात झाला होता.