ज्येष्ठ महासंचालक संजय पांडे हे ठाकरे सरकारवर नाराज, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिला नाराजीनामा

शुक्रवार, 19 मार्च 2021 (10:04 IST)
सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे प्रकरणामुळे अडचणीत आल्याने बदली झालेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह होमगार्डमधून बदली झालेले ज्येष्ठ महासंचालक संजय पांडे हे ठाकरे सरकारवर नाराज आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच नाराजीनामा लिहत आपल्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी केली आहे. ‘मी आजही पोलीस दलात असून माझ्या युनिफॉर्मचा तरी सन्मान करा, होमगार्डमधून मला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर पाठवून माझा अजून अपमान करू नका. मी कोणत्याही परिस्थितीत नवीन पदभार सांभाळणार नाही. मी सुट्टीवर जात आहे. गेल्या तीस वर्षात मला कायम साईडपोस्टींगच मिळाली आणि कायम माझ्यावर अन्यायच झाला. असे खरमरीत पत्र पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहल्याने पोलीस दलात नाराजीनाट्याचा नवा अंक सुरू झाला आहे.
 
संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. पण असे असतानाही त्यांना डावलून गेल्यावर्षी परमबीर सिंह यांना मुंबईचे पोलीस आयुक्त बनवले होते. तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकपदीही माझ्यापेक्षा ज्यूनियर असलेले हेमंत नगराळे यांची नियुक्ती माझ्यावर अन्यायकारकच होती. तसेच तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या केंद्रातील बदली नंतरही माझ्या नावाचा विचार केला नाही असेही पत्रात म्हटले आहे. माझ्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात माझा सीआर रिपोर्ट कायम अतुलनीय राहीलेला आहे. असे असताना मला कायम साईडपोस्टींग का? होमगार्डमध्ये मी सलग पाच वर्ष काम केल्याने आता तरी माझ्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी पांडे यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती