प्रादेशीक परिवहन विभागाच्या कथित आर्थिक गैरप्रकाराबाबत सुरू असलेल्या चौकशीस पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अद्याप या प्रकरणी चौकशी करणे बाकी असल्याने आज ही मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांच्यासह तक्रारदार गजेंद्र पाटील यांची चौकशी केली.
गेल्या पाच दिवसात १२ जणांची चौकशी झाली मुदतवाढ मिळाल्याने संबधीतांना पुन्हा चौकशीचे समन्स बजावली जाणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहाराचे आरोपावरुन चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज हजर झाले. उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेतला. .सोमवारी दुपारी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी चौकशीसाठी पून्हा बोलावले होते. पाटील यांच्याबरोबर परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांचीही चौकशी झाली.
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करावी, अशी याचिका निलंबित गजेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.