जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या २ ते ३ दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झालीय. गेल्या आठवडाभरात धरणातील पाणीसाठयात ४ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमीच पाणीसाठा असल्याने अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांसह सर्वांनाच आहे.
यंदा सरासरी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. परंतु राज्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली जळगाव जिल्ह्यात मात्र, पावसाने चांगलीच ओढ दिल्याचे दिसून आलेय. जून-जुलैत पावसाने ओढ दिल्यानंतर ऑगस्टमध्ये दमदार पाऊस कोसळेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा या तीन तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला.