गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

शनिवार, 18 मार्च 2023 (21:35 IST)
मानवतेच्या, एकतेच्या, समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. सिन्नर येथे लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित जनतेला संबोधित केले. त्यावेळी “लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. दलित, पिडीत, शोषित, गरीब समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णाखोरे, तापी पाटबंधारे विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले”, असे नितीन गडकरी म्हणाले. 
 
स्मारकामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून असा नेता पुन्हा होणार नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडेच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करणार आहे”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
 
मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेल मध्ये गेले नसते : भुजबळ 
यावेळी बोलतांना छगन भुजबळ अतिशय भाऊक झाल्याचे बघावयास मिळाले. ते म्हणाले की, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी राज्यात  सर्वसामान्य 
जनतेच्या हितासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचं अकाली जाणं हे आपल्यासाठी मोठा धक्का आहे. ज्यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांचे वडील माझे मोठे भाऊ मगन भुजबळ यांचं दुःखद निधन झालं त्यावेळी मला अतिशय दुःख झालं होत. त्यानंतर माझे धाकटे भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर माझा धाकटा भाऊही गेल्याने मला अतिशय तीव्र असे दुःख झाले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करत असताना ते अतिशय भाऊक झाले.
 
ते म्हणाले की, स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर माझे अडीच वर्ष जेल मध्ये गेले नसते. पहाडासारखा हा  माझा धाकटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता. महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेसाठी हा नेता आजही आपल्यात पाहिजे होता. राज्यातील गोर गरीब मागासवर्गीय जनतेचे सेवा करण्याचं काम त्यांनी केलं ते काम तुम्हाला आम्हाला पुढे न्यायचे आहे. त्यांचा वारसा आणि त्यांचं काम पंकजाताई अतिशय प्रभावी पणे पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती