लातुरमधील महिलांनी जीएसटीच्या कक्षेतून सॅनिटरी नॅपकिनला वगळण्याची मागणी करत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. लातूरमध्ये बचत गटांमध्ये काम करणाऱ्या सुमारे २० टक्के महिलांच्या गर्भाशयातील पिशवी वयाच्या तिशीतच काढावी लागल्याचं धक्कादायक वास्तव लातुरच्या विचारधारा ग्रामीण विकास संस्थेने समोर आणलं आहे. या गोष्टीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लातुरमधील महिलांचं हे उपोषण सुरू झालं आहे.
३० जूनपर्यंत राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही, तर जुलै महिन्यात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी दिला आहे. विचारधारा ग्रामीण 'विकास संस्थेशी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे ३० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यातील सुमारे २० टक्के महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड वापरत असल्याने आणि उघड्यावर शौचास जात असल्याने त्यांच्या गर्भायची पिशवी अवघ्या तीस वर्षात काढावी लागली आहे', अशी माहिती छाया काकडे यांनी दिली आहे.