"काल महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आला. महाराष्ट्रात महाआघाडीला ११२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ५४ जागांवर यश आले आहे. राष्ट्रवादीला या निवडणुकीत १६.७१ टक्के मतदान मिळाले. राष्ट्रवादीला ९२ लाख १६ हजार ९११ इतके मतदान झाले जे शिवसेनेपेक्षा २ लाखांनी जास्त आहे. भाजपला सरकार जनतेने खरा महाजनादेश दाखवला, सत्तेचा माज उतरवला. आमची खंत आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही मीडियाने भाजप बहुमताने जिंकत असल्याचा पोल दाखवला. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे भाजपची सत्ता जाताजाता राहिली."
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक बोलत होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने संयुक्त पुरोगामी महाआघाडीला कौल दिला त्या पार्श्वभूमीवर यांनी आज मुंबईतील क्लर्क हाउस येथे पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले,
मोदी शाह जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांचे उमेदवार पडले. कार्यकर्त्यांना वाटत होते की आता मोदी आले की जादूची कांडी फिरवेल मात्र मोदी लाट ओसरली आहे. तरुणांना रोजगार नाही, शेतकरी हवालदिल, पूरग्रस्तांना मदत नाही यामध्ये सरकार कुठेच दिसले नाही म्हणून त्यांचा पराभव झाला.